मराठी भाषेचे वय हे साधारणपणे १५०० वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा सतत बदलत राहिली. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.
आद्यकाल
हा काळ इ.स. १२०० पूर्व, म्हणजे लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा लिखाणाचाही पूर्वीचा काल होय. काळातील मराठी शब्दांच़े तसेच़ काही वाक्यांच़े उल्लेख ताम्रपटात तसेच़ शिलालेखात आढळतात.
परळ, मुंबई येथे आढळलेला शिलालेख. हा इ.स ११०९ मध्ये कोरला गेला.
यादवकाल
हा काल इ.स. १२५० ते इ.स. १३५० असा आहे. देवगिरीचा यादवांच़े महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेच़ा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङमयात महत्त्वाची भर घातली. वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राचा बहुतेक सर्व ज़ातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली ,व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्यरचनेस सुरुवात केली. नामदेवशिंपी, गोरा कुंभार,नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तिपर काव्यरचना केल्या व मराठी साहित्याच़े दालन वैविध्यानी समृद्ध केले.
बहामनी काळ
मराठी लेखक व कवी दासोपंत यांच़े सुमारे १५व्या शतकातील लिहिलेले मराठी.
हा काल इ.स. १३५० ते इ.स. १६०० असा आहे. यादवांच़े स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांच़ा काळ सुरू झ़ाला. त्यांना स्थानिक लोक व भाषेचे काही कर्तव्य नव्हते. सरकारी भाषा फारसी झ़ाल्याने मराठी भाषेत ’तारीख’सारख्या अनेक फारसी शब्दांच़े आगमन झाले. अशा धकाधकीचा काळातही मराठी भाषेत साहित्याची भर पडली. नृसिंह सरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, रंगनाथ, विष्णुदास नामा, चोंभा यांनीही मराठी वाङ्मयात भक्तिपर काव्याची भर घातली.
शिवाजी महाराजांच़ा काळ
हा काळ इ.स. १६०० ते इ.स. १७०० असा आहे. या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झ़ाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांच़े आक्रमण थंडावले. असे मानले ज़ाते की शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले. याच़ काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांचामुळे लोकमान्यताही मिळू लागली. मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी संत चरित्रे लिहुन संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली.
रामदास स्वामी यांच़े इ.स १६०० शतकातले मराठी हस्ताक्षर.
पेशवे काळ
हा काल इ.स. १७०० ते इ.स. १८१८ असा आहे. याकाळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केलया. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव ,प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या. याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झ़ाले. याच़ काळात वाङ्मय हा रंजनाच़ा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. याच़ काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत.
इंग्रजी कालखंड
हा काळ इ.स. १८१८ ते आज़तागायत असा आहे. याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच़ काळात रोवली गेली. नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याच़ा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली.
छपाईची सुरुवात झ़ाल्यानंतर मराठी भाषेचा प्रसार उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कॅंडी या आंग्ल अधिकाऱ्याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी विरामचिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले.
स्वात्रंत्योत्त्वर कालखंड
साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. शेकडो उत्साही, नवर्जनशील तरुण आपापले मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, दलित पॅंथर्सचा साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसऱ्या बाजूला ‘अॅकॅडेमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. श्री. पु. भागवत त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु.ल. देशपांड्यांवर पडली. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’च्या उदयाने सुरू झाला.
‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हीसुद्धा साठीच्या दशकातलेच. ‘दलित पॅंथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.
‘माणूस साप्ताहिक’ आणि श्री.ग. माजगावकर यांनीही सर्व प्रस्थापितविरोधी प्रवृत्तींना एकत्र आणायला सुरुवात केली होती. ग.वा. बेहेरेंचे ‘सोबत’ही त्याच काळात दणाणत होते. पु.ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले इचलकरंजीचे साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता. असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन थडकला- ‘स्त्री-मुक्ती’ चळवळीचा. छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवे परिणाम दिले होते. बाळ गांगल या वातावरणाशी निकट होते, त्यांनी प्रकाशात आणलेले कित्येक पुढे थेट प्रथितयश झाले वा विद्रोही- प्रथितयश झाले.
अभिजात मराठी
मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्रा. हरी नरके यांनी मांडलेले मुद्दे :-
- इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत.
- गाथा सप्तशती हा ७०० श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणाअगोदर किमान ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार-विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे. ग्रंथात वापरलेले गेलेले काही शब्द मराठीखेरीज अन्य भारतीय भाषेत नाहीत.
- भांडारकर पुरातत्त्व संशोधन संस्थेमध्ये किमान ८० हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणत्व सिद्ध करणारी आहेत.