अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला ।
नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरें च बोला । वंची वंचला तो चि रे येथें भोवंडा त्याला ॥१॥
घेतल्या वांचून झाडा रे नेदी आपुलें कांहीं । एकां एक ग्वाही बहुत देती मोकळें नाहीं ।
ताक सांडी येर येर रे काला भात भाकरी दहीं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीत तें ही ॥ध्रु.॥
एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनि मोटा । एक सोडितील गाठी रे एक चालती वाटा ।
एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करूनि आराले आतां ऐसें चि घाटा ॥२॥
एकीं स्थिराविल्या गाई रे एक वळत्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोंवतीं घेती ।
एकें चाराबोरा गुंतलीं नाहीं जीवन चित्तीं । एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती ॥३॥
एकीं एकें वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुलें । आपण घरींच गुंतले माळा नासिलीं फुलें ।
गांठीचें तें सोडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोढी रे भार वाहातां मेलें ॥४॥
एक ते माया गुंतले घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया कांहीं च ठावें ।
जैसें होतें शिळे संचित तैसें लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचुनि मग पडिलें ठावें ॥५॥
एकीं हातीं पायीं पटे रे अंगीं लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके केली सपाट शिखा ।
एक ते आळसी तळीं रे वरी वाढिल्या काखा । सिदोरी वांचून बुद्धि रे केला अवघ्यां वाखा ॥६॥
तुका म्हणे आतां कान्होबा आम्हां वांटोनि द्यावें । आहे नाहीं आम्हांपाशीं तें तुज अवघें चि ठावें ।
मोकलितां तुम्ही शरण आम्ही कवणासि जावें । कृपावंते कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥७॥
अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला
Posted on: 2021-06-30 18:10:55 +0530 | Tags: अभंग •