मराठी भाषा

Posted on: 2020-10-29 19:43:07 +0530 | Tags: wikiमराठी


मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठी भाषेचा गौरव ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून ही केलेला दिसून येतो. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारत देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे.

मराठी भाषिक प्रदेश

मराठी भाषा मुख्यत्वे भारतातील महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक (बेळगांव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण गुजरात, सुरत, बडोदाअहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद), मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे वाढत आहे.

मराठी भाषा भारतासह मॉरिशसइस्रायल या देशांतही बोलली जाते. त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलियान्यूझीलंड येथेही बोलली जाते.

राजभाषा

भारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी), महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे), उस्मानिया विद्यापीठ (तेलंगण), गुलबर्गा विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर) व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली) येथे मराठी उच्चशिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरील एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.

मराठी भाषा दिवस

विष्णू वामन शिरवाडकर, (२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कारविजेते अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

Source: Wikipedia