अव्वल : कमला हॅरिस

Posted on: 2020-11-09 12:05:27 +0530 | Tags: mtblog


अमेरिकेत राजकीय बदल होत असतानाच इतिहास घडत आहे आणि त्या बदलांचा चेहरा कमला हॅरिस यांचा आहे. पहिल्या महिला उपाध्यक्ष कमला म्हणजे ज्यासाठी सगळे अमेरिकेचा रस्ता पकडतात ते ‘अमेरिकन ड्रीम’ खरे असल्याचे ताजे उदाहरण आहे.

त्यांनी केवळ पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा मान मिळवला नाही, तर त्या पहिल्या श्वेतेतर उपाध्यक्ष आहेत. तसेच, या पदावर येणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन व त्याचबरोबर पहिल्या आशियाई वंशाच्या व्यक्ती आहेत. अध्यक्ष बनण्याचे स्वप्न बाजूला सारून ज्यो बायडन यांच्यासह अध्यक्षीय निवडणुकीत सामील झालेल्या कमला व्यवसायाने वकील आहेत. कॅलिफोर्नियात जन्म आणि हार्वर्डमधून पदवी घेतल्यानंतर आपल्या राज्यातच त्या स्टेट अटर्नी बनल्या. ५६ वर्षांच्या कमला यांनी उपाध्यक्ष होण्याआधीही अनेक ‘पहिल्या’चे विक्रम नोंदवले आहेत. त्या काऊंटीच्या पहिल्या महिला डिस्ट्रिक्ट ॲटर्नी होत्या आणि त्या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या आशियाई अमेरिकन. अमेरिकेत कर्तृत्वाला मान मिळतो आणि तेथे स्वप्ने साकार होतात, या म्हणण्याला त्यांच्या निवडीने पुष्टी मिळाली. यात अर्थातच कमला यांच्या कष्ट आणि कर्तृत्वाचा मोठा हिस्सा आहे. आता सर्वांचे लक्ष या घडामोडींचा भारतावर काय परिणाम होईल, याकडे असेल. पण शेवटी कमला या अमेरिकी आहेत, भारतीय नाहीत. त्यामुळे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य अमेरिकेचे हित जपणे हेच असणार. शिवाय, कोणत्याही पक्षाची सत्ता आली तरी प्रत्येक देशाचे जागतिक धोरण स्वहिताचे असते. पण म्हणून कमला यांच्या विजयाचे महत्त्व कमी होत नाही. त्यांनी म्हटल्यानुसार, ‘मी पहिली आहे, पण शेवटची असणार नाही’, या विधानातूनच या विजयाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Source: Maharashtra Times