‘इंडियन प्रीमिअर’ शो

Posted on: 2020-11-12 14:39:57 +0530 | Tags: mtblog


ipl-2020

भारतात ज्याला धर्म मानले जाते, त्या क्रिकेटला काही वर्षांपूर्वी ‘इंडियन प्रीमियर लीग’चे कोंदण मिळाले आणि एकूणच जगभरातील क्रिकेट एका वेगळ्या वळणावर पोहोचले. आयपीएलने क्रिकेट जगतासाठी झटपट क्रिकेट लीगचा मार्ग प्रशस्त केला. आज क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक देशात अशा लीगचा उदय झालेला आहे. किंबहुना, भारतात अनेक क्रीडा प्रकारांत सुरू झालेल्या लीगचा पायाही ‘आयपीएल’नेच घालून दिला आहे. अशी ही लीग यंदा होणार की नाही, या विवंचनेत भारतीय क्रिकेट बोर्ड होते. या आधीही, निवडणुकांमुळे ‘आयपीएल’ परदेशात खेळविण्याची वेळ आली होती; पण यंदा करोनामुळे भारतात क्रिकेट आयोजनाचा विचारही शक्य नव्हता. तेव्हा बीसीसीआयने संयुक्त अरब अमिरातीत या लीगचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. खरे तर, करोना काळात धोका पत्करून लीग आयोजित केल्याबद्दल बीसीसीआयचे कौतुक करावे लागेल. त्यात असलेला अफाट पैसा, प्रचंड गुंतवणूक या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या, तरी लीग आयोजित करता आल्यास क्रीडा क्षेत्राला किंबहुना, क्रिकेटला मोठा दिलासा मिळेल, हा विचार त्यामागे असावा. करोनाच्या काळातही काळजी घेत, पुरुष आणि महिलांच्या लीगचे व्यवस्थापन करता येते, हे या आयोजनाने दाखवून दिले. यंदा ‘आयपीएल’चे पाचवे विजेतेपद पटकाविल्याबद्दल ‘मुंबई इंडियन्स’चे कौतुक करावे लागेल. २००८पासून हा संघ संभाव्य विजेत्यांत गणला गेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघाने आपली ताकद पुन्हा दाखवून दिली; पण ‘दिल्ली कॅपिटल्स’लाही शाबासकी द्यावी लागेल. पहिलेवहिले विजेतेपद मिळविण्याचे दिल्लीचे स्वप्न भंगले खरे; पण यंदा या दोन संघांत असलेली चुरस अंतिम फेरीपर्यंत कायम राहिली. बलाढ्य ‘चेन्नई सुपर किंग्ज’ला मात्र बाद फेरीत प्रथमच स्थान मिळविता आले नाही. वयाने ज्येष्ठ खेळाडूंचा भरणा त्यांना भोवला. भारतीय संघाचा कर्णधार विराटही बेंगळुरू संघाला तारू शकला नाही. प्रेक्षकांविना ‘आयपीएल’ आयोजित होऊनही, जगभरातील असंख्य चाहत्यांनी या लीगचा मनमुराद आनंद लुटला. जगातील कुठल्याही कोपऱ्यात आणि कोणत्याही संकटकाळात ‘आयपीएल’ आयोजित केली, तरी तिची लोकप्रियता अबाधित राहते, हेच या लीगच्या यशाचे गमक आहे.

Source: Maharashtra Times