खरंच बोलायचं तर आपलं काय जातंय एक दिवसाचा शिवप्रताप साजरा करायला ?

त्या दहा पंधरा मिनिटांच्या झटापटीसाठी आणि त्यानंतर करायच्या खानाच्या फौजेच्या बरबादीसाठी महाराजांनी किती दिवस किती प्रहर किती रात्री नियोजनात घालवल्या असतील..
किती खलबतं.. किती शक्यता अशक्यता..
किती बातम्या.. किती निर्णय.. किती सराव.. किती आदेश आणि किती असुरक्षितता..
आणि किती तो पराकोटीचा पराक्रम..!
कहर म्हणजे दक्षिणेतले चार-पाच मांडलिक राजे बगलेत दाबुन मारुन आता तुझी पाळी म्हणत काळ्याभोर ढगासारखा गडगडत हा खान रोज काही मैल स्वराज्याकडं सरकत होता..
सरळ जावं बगलेत दाबावं आणि विषय मिटवावा अशी जरी पद्धत असली तरी महाधुर्तपणा गाठीशी ठेवणारा हा खान..
आख्खा जनाना कापुन खुनशीनं हळुहळु जावळी जवळ करत होता..
अर्थातच स्वराज्यातलं वातावरण भितीनं ग्रासलेलं.
आधीच खानानं एकमेवाद्वितीय योद्धा म्हणुन लौकीक असणारे शहाजीराजांचे थोरले पुत्र आणि शिवाजीराजांचे जेष्ठ बंधु थोरले संभाजीराजे यांना कपटाने मारलं..
कपट वापरुनंच यानं महाराजसाहेब फर्जंद शहाजीराजे यांना कैद केलं होतं आणि हा बाबा आता स्वराज्य जवळ करीत होता..
भोसलेकुळाचा नामोनिशाण नष्ट करण्याचं डोक्यात घेणारा अफजल खान मदमस्तवाल हत्तीसारखा चालुन आला होता..
बुद्धी आणि कौशल्य वापरुन खान विजापुराहुन निघाल्याची वार्ता कानी आल्यापासुन त्याच्या मृत्युची तयारी करण्यात राजे गुंग..
पदरची सगळी कुटनिती वापरुन खानाला जावळीत महाराजांनी आणला..
हे कमी म्हणुन की काय त्याला वाईपर्यंत ओढला आणि मुत्सद्दीपणाचा कळस म्हणजे खानाला प्रतापगडावर यायला प्रवृत्त केलं..
स्वस्तुतीत मग्न आणि अहंकारात खोल बुडालेल्या व्यक्तीचा अफजलखान होतो.
आपल्यापेक्षा तीन-चार पटीनं बलवान खानाशी द्वंद्व होणार आणि याची तयारी असावी म्हणुन राजे तयारीत मग्न किंबहुना खानाला ठार करण्याची तयारी आरंभिली गेली.
अर्ध्या हळकुंडानं पिवळा होऊन खानानं सह्यस्वामीच्या गुहेत प्रवेश केला आणि स्वतःची इहलोक सोडुन जाण्याची तयारी केली.
घाटमाथे,डोंगरदर्या,घळ्यापठारं आणि रानावनात दडुन बसलेले जाँनिसार मावळे माचीवरच्या तोफांची वाट पहात बेमालुम लपुन बसले..
गडावर खान मातबरीनं आला.बकर्याला आधी पाणी पाजतात तशी खानाला शामियान्यातली संपत्ती आणि ऐश्वर्य पाजलं गेलं.
पुढच्या काही वेळात महाराष्ट्राचं किंबहुना हिंदुस्तानाचं भवितव्य ठरणार होतं.
चित्त्याची चाल चालत राजे आले.
आलिंगनं झाली,नमस्कार चमत्कार झाले,गळाभेट झाली.
जिंकण्याच्या उद्देशानंच स्वराज्यरथ हाकणार्या शिवाजीराजानं अवघ्या काही क्षणात विषय मिटवला राजे गडावर दाखल झाले..
इशारतीच्या तोफा घुमल्या आणि आख्ख्या जावळी खोर्यात घुमलं मराठा नावाचं वादळ..
सुरु झालं जोरदार रणकंदन..
खानाच्या फौजेची तुफान धुळधाण उडवली गेली..
युगानुयुगे अभ्यासण्याचा एक अध्याय पुर्ण झाला..
भगवा अबाधित राहीला..
आमचा राजा अबाधित राहीला..
हा विजय ही फत्ते म्हणजे मेहनत होती कैक जागल्या रात्रींची..
रोज केलेल्या सरावाची..
काटेकोर नियोजनाची आणि फक्त जिंकण्यासाठी आखलेल्या एका महान योजनेची..
जगाचा इतिहास साक्षी आहे,काटेकोर नियोजन आणि तत्पर अंमलबजावणी ही विजयाची नांदी असते.
हे युद्ध जिंकण्यासाठीची अपार मेहनत,नियोजन,तत्परता या काळातही माणसाला जिंकण्यासाठी खुप काही शिकवुन जाते.
पण आपण करंटे फक्त एका दिवसापुरतं आठवतो..
लढाई..नियोजन..पराक्रम.. वगैरे वगैरे..
पराक्रमाच्या महान परंपरेला मुजरा..
थोर पराक्रमी लढवय्यांना मुजरा..
छत्रपती शिवरायांना मुजरा..
जय शिवराय
- विशाल गवळी